जालना प्रतिनिधी । येथील जांगडेनगर पसिरात २० ते २२ जानेवारीच्या दरम्यान भव्य भीम फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने भीम फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांना विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये दि. २० रोजी सकाळी १० ते १ या वेळेत बहुजन समाजासाठी कार्य केलेल्या थोर व्यक्तींचे चित्र रेखाटण्याची महाचित्रकला स्पर्धा होणार आहे. सायं.५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भीम फेस्टीव्हचे उदघाटन होईल. सात ते दहा या वेळेत ख्यातनाम गायक शाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही शाहीरी जलसा हा कार्यक्रम होणार आहे. दि. २१ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत बहुजन समाजासाठी कार्य केलेल्या थोर व्यक्तींचे रांगोळी स्पर्धा होणार असून, यात महिला व पुरुषांना सहभागी होता येणार आहे. सायंकाळी सात ते दहा दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या जीवनदर्शनावर आधारित महासूर्य महानाट्याचा कार्यक्रम होणार आहे. या महानाट्यातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंग, दाखविण्यात येणार आहे. तर दि. २२ रोजी १० ते १ या वेळेत महाआरोग्य शिबीर होणार आहे.
या पत्रकार परिषदेला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर,शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाबूराव ससाणे, पंडित भुतेकर, भास्कर मगरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.