जामनेर. लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देशामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी नेहमी केंद्रसरकार तत्पर असून सर्व स्तरावर मदत केली जाते. त्यामध्ये अन्नधान्य असेल व गोरगरिबांना मिळणारी मदत दिली जात आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास घेऊन केंद्र सरकार काम करत असल्याचे मत आमदार गिरीश महाजन यांनी मांडले.
जामनेर तालुक्यातील दिव्यांगांना धान्य मिळावे व मदत व्हावी या उद्देशाने तहसीलदार अरुण शेवाळे व पुरवठा अधिकारी विठ्ठल काकडे यांनी लाभार्थ्यांची निवड करून दि. ९ रोजी अंत्योदय योजनेअंतर्गत आमदार गिरीश महाजन व तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते ७७ दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड वाटप करण्यात आले. त्याच बरोबर यावेळी शासनाच्या कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत २० लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आला. यावेळी पुरवठा अधिकारी विठ्ठल काकडे, प्रा. शरद पाटील, अशोक पाटील, तुकाराम निकम, दिव्यांगाचे प्रतिनिधी रवींद्र झाल्टे, पवन माळी, पुरवठा विभागाचे गणेश राजपूत नेरकर, रघुनाथ पवार आदी यावेळी उपस्थित होते. आमदार गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की, शासन स्तरावर वेळोवेळी गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असून केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना गरीब जनतेपर्यंत पोहोचविली जात आहे. त्यामध्ये उज्वला गॅस योजना, स्वच्छ भारत अंतर्गत शौचालय, दर महिन्याला मोफत रेशन दिले जाते. याच बरोबर आता जामनेर तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड देण्यासाठी तहसीलदार पुरवठा अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी प्रयत्न करून दिव्यांग बांधवांना रेशन कार्ड देण्यात आले आहे. यामुळे जर अधिकारी चांगले राहिले तर नक्कीच चांगले काम होते. हे उदाहरण आता आपल्यासमोर आले आहे. त्याचबरोबर शासनस्तरावर सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार तत्पर आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या अंत्योदय कार्ड योजनेअंतर्गत प्रत्येक कार्डधारकाला ३५ किलो धान्य वितरीत केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.