जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जामनेरात अकराशे फूट लांबीच्या तिरंगासह पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी ‘आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून दूर रहावे’ असे आवाहन ना. गिरीश महाजन यांनी केले.
“आज तरुण हा दिवसेंदिवस व्यसनाधीन होत चालला असून त्यामुळे तरुण पिढी कमकुवत होत चालली आहे. जर आपल्याला देश सुरक्षित ठेवायचा असेल; तर आजचा आपला तरुण हा तंदुरुस्त राहिला पाहिजे. त्यामुळे आपण सगळ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित कार्यक्रमात बोलताना कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जामनेर धारिवाल महाविद्यालयातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने शहरातून अकराशे फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदा यात्रेमध्ये कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांत अध्यक्ष अंकिता पवार, पवन बाविस्कर, कल्पेश बेलदार, नगराध्यक्ष साधना महाजन, नगरपालिका उपनगराध्यक्ष शरद पाटील, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नगरसेवक अतिश झाल्टे, दीपक पाटील, रवींद्र झाल्टे यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पदाधिकारी व कार्यकर्ते विद्यार्थी सामील झाले होते.
धारिवाल महाविद्यालयापासून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. ना. गिरीश महाजन यांनी पदयात्रेस हिरवा झेंडा दाखविला. तिरंगा पदयात्रेचा जळगाव रोड, भुसावळ रोड, नगरपालिका चौक मार्गे गांधी चौकात समारोप करण्यात आला. याप्रसंगी ना.गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असून दिवाळी दसऱ्याप्रमाणे हा उत्सव साजरा करावा. त्याचबरोबर ‘हर घर तिरंगा’ लावून मोठ्या जल्लोषात आपण सगळ्यांनी अमृत महोत्सव साजरा करा.” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.