जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभरात मार्च महिन्याच्या दुसर्या गुरुवारी साजरा केला जातो. यंदाच्यावर्षी किडनी दिनानिमित्त गुरुवार दि. १० मार्च रोजी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील डायलिसीस विभागात २५ रुग्णांचे डायलिसीस मोफत करण्यात आले. यात भुसावळ येथील २३ वर्षीय तरुणासह पाचोरा तालुक्यातील ९१ वर्षीय आजींचाही समावेश होता.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डायलिसीस विभाग हा ३६५ दिवस २४ तास सेवेत असतो. येथे दर शनिवारी किडनी तज्ञ डॉ. अभय जोशी यांच्याकडून रुग्णांना मोफत सल्ला देवून उपचारही केले जातात. तसेच मोफत डायलिसीसची सुविधा उपलब्ध आहे. एकाचवेळी ३० रुग्णांवर येथे डायलिसीस केले जाईल या पद्धतीने रचना करण्यात आली आहे. आज दिवसभरात २५ रुग्णांवर मोफत डायलिसीस करण्यात आले. यासाठी टेक्निशियन रवि बोरसे, भाग्यश्री वाणी यांनी परिश्रम घेतले.
९१ वर्षांच्या आजींवर ८ वर्षांपासून डायलिसीस
जामनेर तालुक्यातील वाघळी येथील ९१ वर्षीय द्वारकाबाई तेली या आजींवर आठ वर्षांपासून डायलिसीस केले जात आहे. प्रत्येक आठवड्यात दोन वेळेस त्यांना डायलिसीसची गरज भासते, आठ वर्षांपासून त्यांना डायलिसीसचा लाभ दिला जात आहे. जामनेर येथून रुग्णालयापर्यंत येण्यासाठी जो त्रास होतो तो येथे आल्यावर मिळालेल्या सुविधेमुळे क्षणात दूर होतो, वर्षानुवर्षे येथे आमच्या आजींवर उपचार होत असल्याने रुग्णाचा नातू अभिषेक राजेश तेली यांने आभार मानले.
२४ तास डायलिसीसची सुविधा
एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी डायलिसीस करण्यास सांगितले जाते, त्यावेळी रुग्णासह संपूर्ण घरादाराची कसोटी लागते. यात आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक अशा अनेक पातळ्यांवर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक झुंजत असतात. यात केवळ दोनच पर्याय रुग्णासमोर असतात एक म्हणजे डायलिसीस करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे किडनी प्रत्यारोपण हा असतो. हे दोन्ही पर्याय वेळखाऊ आणि खर्चिक असतात. यातील डायलिसीस हा पर्याय डॉ .उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत येथे डायलिसीसची सुविधा मोफत दिली जाते.
रुग्ण शांताराम मोरे यांनी आपल्या अनुभव व्यक्त करतांना सांगितले की, गेल्या काही वर्षापासून मी किडनी विकाराने त्रस्त झालो होतो. त्यावर मला डायलिसीस हा पर्याय डॉक्टरांनी दिला. त्यानुसार डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील डायलिसीस विभागात २०१९ पासून मी उपचार घेत आहे. एक, दोन नव्हे तर तब्ब्ल चार वर्षांपासून मी डायलिसीस करण्यासाठी येथे येत आहे. येथील टेक्निशियन खुप चांगल्या प्रकारे सेवा बजावतात. उपचारासोबतच सौम्यपणे बोलणे आणि वेळोवेळी काळजी घेण्याचे कार्य हे वाखाण्याजोगे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून डायलिसीस हे मोफत केले जात असून त्याचा या रुग्णालयात मला लाभ मिळत आहे असून उत्तम सेवेची अनुभूती मी घेत आहे.