जळोद जि.प.शाळेत मोफत सायकलीचे वाटप

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील जळोद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे हिंगोणेसिम येथून तीन किमी पायी चालत येणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी हे होते तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष सतीलाल भोई, मुख्याध्यापिका सुरेखा देसले, सरपंच भारती साळुंके हिंगोणेसिमचे उपसरपंच शालीक कोळी यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

हिंगोणेसिम येथून जळोद शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार असून शाळेत नियमित उपस्थित राहण्यास व अध्ययन करण्यास मदत होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवनिमित्त युवकमित्र परिवार संस्थेतर्फ ‘सायकल बँक’उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे,मुंबई शहरातील नागरिकांनी दान केलेल्या जुन्या सायकली दुरुस्त करून ग्रामीण भागातील लांब दूरवर असणाऱ्या शाळांमध्ये पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमंतर्गत मोफत सायकल भेट दिल्या जातात. हिंगोणेसिम येथून जळोद शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर कुवर यांनी सायकलीची मागणी केली होती.

त्यानुसार युवकमित्र संस्थेचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी मोफत सायकल उपलब्ध करून दिल्या.सायकल दुरुस्तीसाठी स्थानिक गावकऱ्यांचे सहकार्य लाभले तर आभार मुख्यध्यापिका सुरेखा देसले यांनी मानले.उपक्रम यशस्वीतेसाठी युवकमित्र संस्थेचे आकाश भोई,भूषण देसले यांचे सहकार्य लाभले.

Protected Content