जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा शहराकडे मोठ्या प्रमाणात रोकड जाणार असल्याच्या गुप्त माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून एका वाहनातून तब्बल 28 लाख 80 हजार एवढी रोकड जप्त केली आहे. यावेळी तिघांना अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान, ही रक्कम खाजगी कापूस व्यापाऱ्याची असल्याचे कळते. याबाबत कागदपत्र तपासणीचे काम सुरु आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 20 जून रोजी रोजी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना माहीती मिळाली होती की, शिरसोली रोडने मोठी रक्कम पाचोरा शहराकडे जाणार आहे. त्यानुसार पो.नि लोकरे यांनी स.फौ. अतुल वंजारी, स.फौ. आनंदसिंग पाटील, स.फौ. रामकृष्ण पाटील, पो.कॉ. हेमंत पाटील, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. समाधान पाटील, पो.कॉ. योगेश बारी, पो.कॉ. मुदस्स्र काझी यांचे पथक कारवाई कामी रवाना केले. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील हॉटेल ग्रॅपीज जवळ जळगाव कडुन क्रुझर कार क्रमांक (एम.एच. 13 ऐसी 7463) ही येतांना दिसली. वाहन चालकाच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने सदर वाहन पोलीस पथकाने थांबविले. यावेळी वाहनात बसलेले ३ इसम नामे 1) अंकुश रमेश पाटील (वय 28 वर्ष, रा. सार्वे पिंपरी, ता. पाचोरा जि. जळगाव) 2) रोशन निसार पटेल (वय 22 वर्ष, रा. सार्वे पिंपरी, ता. पाचोरा जि. जळगाव) 3) निलेश राजेंद्र कुमावत (वय 25 वर्ष, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे होते. त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्र नसल्यामुळे क्रुझरची कसुन तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांना एक काळी बॅगमध्ये पुर्ण पैसे भरलेले दिसले. सदर रक्कम बाबत तिन्ही इसम समाधानकारक उत्तरे देत नव्हते. त्यामुळे संशयिताना क्रुझर कारसह पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या समक्ष मिळालेलया रकमेचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळी सदरची रक्कम तब्बल 28,80,000 रुपये अशी होती. सदर रकमेबाबत नमुद इसमांनी खात्रीशीर माहीती न दिल्याने सदर रक्कम व कार जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सदरची रक्कम संशयितांनी कुठून आणली आणि कुठं घेऊन जात होते? बाबत पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, ही रक्कम खाजगी कापूस व्यापाऱ्याची असल्याचे कळते. पुढील तपास स.फौ. रामकृष्ण पाटील करीत हे करीत आहे.