जळगाव शहर निर्जंतुकीकरणासाठी मनपाकडून फवारणी (व्हिडिओ)

 

जळगाव,प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. शहर निर्मनुष्य असल्याने महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासन आणि समाजसेवकांच्या सहकार्याने शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, शासकीय रुग्णालय परिसर फवारणी करून निर्जंतुक करून घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जळगाव शहरात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी म्हणून महापौर भारती सोनवणे योग्य त्या उपाययोजना राबवित आहे. संचारबंदी काळात जळगाव शहरातील सर्व प्रमुख रस्ते, शासकीय रुग्णालय परिसर, बाजारपेठ परिसर, गावठाण परिसर निर्जंतुक करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. मनपा इमारतीपासून फवारणीसाठी सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, विशाल त्रिपाठी, मलेरिया विभागाचे सुधीर सोनवाल व इतर आरोग्य विभाग कर्मचारी उपस्थित होते.

समाजसेवकांचे सहकार्य
जळगाव शहर निर्जंतुक करण्यासाठी महापौर आणि मनपा प्रशासनाने पुढाकार घेतल्यानंतर समाजसेवकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला. जळगावातील प्रा.डी.डी.बच्छाव व पिलखेडा येथील हर्षल चौधरी यांनी स्वतःचे स्प्रिंकलर फवारणीकामी उपलब्ध करून दिले.

नागरिकांनी घरातच रहावे
सुदैवाने जळगाव शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी खबरदारी म्हणून घरातच राहावे. प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/516777269023179/

Protected Content