जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव व धुळ्यासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती धुळे येथे स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सोमवार ९ मे पासून कार्यन्वित झाल्याने जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीत जाण्यासाठी होणारी आर्थिक पिळवणूक थांबण्यास मदत मिळणार आहे.
जळगाव ,धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी नंदुरबार येथे अनुसूचित जमाती जातपडताळणी समिती होती. सदर समिती नंदुरबार येथील आदिवासी बांधवांसाठी सोयीची होती तर धुळे व जळगाव जिल्ह्यातील बांधवांसाठी लांब अंतरामुळे गैरसोयीची होती. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील पाल, मुक्तताईनगर येथील आदिवासी बांधवांना नंदुरबार येथे जाण्यासाठी सोयीच्या रेल्वे नव्हत्या , एसटीने ४ ते ५ तास लागायचे त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक झळ बसत होती. तसेच नंदुरबार समितीकडे कामाचा लोड अधिक असल्याने वैधता मिळण्यास अडचणी येत होत्या. याबाबत धुळ्यात नवीन समिती स्थापन करण्याबत शासनस्तरावरन चालढकल होत होती. धुळ्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती समिती व्हावी यासाठी जळगाव येथील प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेने अॅड. मोहनिश थोरात यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली होती व इतरही काही संस्था न्यायालयात गेल्या होत्या. या सर्वांचा परिपाक म्हणून धुळे येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती दिनांक ९ मे पासून आदिवासी मुलांचे वसतिगृह देवपूर धुळे येथे कार्यान्वित झाल्याचे अनुसूचित जमाती समिती, धुळे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष गिरीष सरोदे यांनी कळविले आहे.
याबाबत प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाठे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, धुळे येथे समिती स्थापन झाल्याने जळगाव व धुळे जिल्ह्यातील लाखो आदिवासी बांधवांचा फार मोठा आर्थिक खर्च वाचणार असून शासनाने माजी न्यायामुर्ती आर. वाय. ग्यानू समितीच्या शिफारसीनुसार पुरेसा कर्मचारी वर्ग समितीस उपलब्ध करून द्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.