जळगाव जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात २४ हजार ३२० कोरोना लसींचा पुरवठा

 

जळगाव, : प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सोळा जानेवारीपासून कोवीड लसीकरण सुरु होणार आहे. प्रथम आरेाग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरण होईल, त्यासाठी जिल्ह्यात २४ हजार ३२० ‘कोवीशिल्ड’ लशी १४ जानेवारी रोजी येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात होणार आहे. सुरुवातीस ९ केंद्रावर लस देण्यात येतील. ८ जानेवारीस लसीकरणाची रंगीत तालीमही झाली आहे. शंभर जणांवर जिल्ह्यात चार ठिकाणी रंगीत तालीम झाली होती. १६ पासून प्रत्यक्षात लसीकरणास सुरुवात होणार आहेत. ९ केंद्रावरील लसीकरणासाठी नेमलेल्या कमचाऱ्यांना प्रशिक्षण जिल्हा रुग्णालयात देण्यात आले. आज मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागातर्फे व्ही.सी. झाली. त्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद सहभागी झाले होते.

जिल्ह्यात अगोदर आरोग्य क्षेत्रातील चौदा हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहेत. नंतर पोलीस, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. १६ जानेवारी रोजी जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या तीन उपजिल्हा रुग्णालयात, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयात तर जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय (पंचमुखी हनुमान मंदिरामागे), भिकमचंद जैन रुग्णालय (शिवाजीनगर, जळगाव) असे एकूण नऊ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Protected Content