जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हॉकर्स सर्वेक्षण कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने शहरातील फेरीवाल्यांचे आज मंगळवार दि. २८ जूनपासून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज मंगळवार दि. २८ जून रोजी अतिरिक्त आयुक्त शाम गोसावी यांच्या हस्ते बळीराम पेठेपासून करण्यात आली. याप्रसंगी एनएमएलयुच्या व्यवस्थापक गायत्री पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख संजय ठाकूर, एनयुएलएमचे अधिकारी लहासे, थ्रीजी इव्हेंट मॅनेजमेंट गृपचे प्रसाद लढे आदी उपस्थित होते. हे सर्वेक्षण जवळपास २ महिने चालणार आहे. या सर्वेक्षणात नोंदणी झालेल्या सर्व हॉकर्स यांची अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी कामगार आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. यानंतर कामगार आयुक्त फेरीवाला समितीची निवडणूक जाहीर करतील. या निवडणुकीत ज्या हॉकर्सचे सर्वेक्षण झाले आहे त्यांना मतदान करता येणार असून त्यानंतर निवडून आलेल्या हॉकर्स प्रतिनिधींची अंतिम फेरीवाला समिती स्थापन होणार आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त शाम गोसावी यांनी हॉकर्स बांधवांना सर्वेक्षक यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जे हॉकर्स रस्त्याच्या बाजूला व रहदारीस अडथळा न करता व्यवसाय करत आहे त्यांचेच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/701528480941562