जळगाव प्रतिनिधी । रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वे इंजिनचा धक्का लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी हनुमाननगराजवळ घडली.
चंद्रशेखर देविदास भडणगर (३२) रा. जीवननगर असे मृत तरूणाचे नाव आहे. चंद्रशेखर याचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. चंद्रशेखर हा एमआयडीसीत कंपनीत कामाला जाऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लावत असायचा. तर त्याचे वडील देविदास भडणगर हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान आज सकाळी बाहेरून येतो, असे सांगून तरूण घराबाहेर पडला. हनुमाननगर जवळ रेल्वेरूळ क्रॉस करत असताना डाऊन लाईनवर इंजिनचा धक्का लागून तो फेकला गेला. त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो रक्ताच्या थारोळयात पडल्याची घटना आज सकाळी दहा वाजेपूर्वी घडली. खबर कळताच रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनिल फेगडे तसेच विनोद शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोक सपकाळे यांच्या रूग्णवाहिकेतून तरूणाला जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. ही वार्ता कानावर पडल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. चंद्रशेखर याचा ०८ डिसेंबर १९ रोजी विवाह झाला होता. काम कोणतेही असो त्यासाठी त्याची तयारी असायची. कष्टाळू वृत्ती असल्याने अनेक ठिकाणी त्याला कामे मिळत असायची. सध्या तो कंपनीत
कार्यरत होता. मयताच्या पश्चात पत्नी, आई सिंधूबाई, वडील देविदास भडणगर, लहान भाऊ पप्पू असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास विनोद शिंदे हे करीत आहेत.