जळगावात महिला वाहकाने विभाग नियंत्रकाच्या डोळ्यावर मारला मिरचीचा स्प्रे; पोलीसात गुन्हा

crime 151889 730x419

जळगाव प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे कार्यरत असलेल्या महिला वाहकाने वाहकाने एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या डोळ्यात मिरची पावडरचे पाणी केलेला स्प्रे फवारल्याची घटना आज सकाळी १० वाजता जळगाव आगारात घडली. याप्रकरणी वाहक सुनीता लोहार यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहार यांना अटक करण्यात आली आहे.

देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी १० वाजता कार्यालयाच्या जिन्याच्या खाली साफसफाई बाबत स्थानक प्रमुख निलीमा बागुल यांना सूचना देत असताना अक्कलकुवा आगाराच्या वाहक सुनिता लोहार या देवरे यांच्या दालनाकडून आरडाओरड करीत जिन्याकडे आल्या व काही कळण्याच्या आतच त्यांनी मिरची पावडरचे पाणी बाटलीच्या स्प्रेमधून देवरे यांच्या डोळ्यात फवारले. प्रचंड आग व भोवळसारखा प्रकार झाल्याने अन्य कर्मचाऱ्‍यांनी देवरे यांना तत्काळ डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेले. तेथे उपचार केल्यानंतर दुसऱ्‍या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर देवरे जिल्हा पेठ पोलिसात सुनिता लोहार यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहक महिलेस ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी महिलेकडून प्रकार जाणून घेतला.

निलंबनाच्या कारवाईने वाद चिघळला
राजेंद्र देवरे हे अडीच वषार्पूर्वी धुळे विभागात नियंत्रक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी वाहक सुनिता लोहार यांच्याविरोधात डेपोमध्ये अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. तसेच महिलेचे वर्तन अरेरावीचे, वरीष्ठांचे काही एक ऐकुन न घेता वादविवाद करण्यासारखे होते. सात आठ तक्रारीवरून महिलेचा निलंबनाचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवुन तिला निलंबित केले होते. याचा राग धरून लोहार यांनी देवरे यांच्यावर मिरची पुड स्प्रे मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान विभाग नियंत्रक देवरे यांच्यावर धुळे येथे असताना विनयभगांचाही गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.

Protected Content