जळगाव प्रतिनिधी । संचारबंदीच्या काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक केली असून त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातील दारू आणि मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी लखन दिवाणसिंग गुमाने (वय-३८) रा. गवळी वाडा, तांबापूरा जळगाव हा आपल्या मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ सीडी ०७६८) वर प्लॅस्टीक कॅनमध्ये गावठी हातभट्टीची दारू घेवून जात असल्याची माहीती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर सोमवारी रात्री ८ वाजता शिरसोली येथून कंजरवाडा येथे जात असतांना इच्छादेवी पोलीस चौकीजवळ आणि शिरसोली नाक्यादरम्यान कारवाई करत संशयित आरोपीची चौकशी केली असता त्याच्याजवळ गावठी हातभट्टीची दोन हजार रूपयाची दारू आढळून आली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू आणि ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी असा एकुण ५२ हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप हजारे, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ हर्षवर्धन सपकाळे, पो.कॉ. इम्रान सैय्यद, पो.कॉ. गोविंदा पाटील, पोकॉ असीम तडवी यांनी कारवाई केली.