जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपातर्फे शहरातील आव्हाने रोडला असलेल्या ओम साई नगरात सोमवार ३० मार्च रोजी फवारणी सुरु असतांना एका इसमाने ती करून घेण्यास नकार देत खाजगी व्यावसायिकास मारहाण करून जखमी केल्याची घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, खाजगी व्यावसायिक अजय घेंगट यांनी ते राहत असलेल्या ओम साई नगरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडे फवारणीची मागणी केली होती. यानुसार सोमवार ३० मार्च रोजी मनपा कर्मचारी ओम साई नगरात फवारणीसाठी गेले होते. यावेळी अजय घेंगट हे कर्मचाऱ्यांसोबत फिरून फवारवणी करून घेत होते. परंतु, घेंगट जेव्हा सकाळी १० वाजेच्या सुमारास फवारणी पथकासह ओम साई नगरात आरोपी किशोर नारायण गवळी यांच्या घरासमोर आले असता गवळी याने फवारणी करून घेण्यास नकार देत आम्हाला कुठल्याही प्रकारची रोगराई आजार नसून मला फवारणी करायची नाही असे म्हणत घेंगट व कॉलोनीतलं लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर गवळी याने त्याच्या घरातुन एक लोखंडी वस्तू आणून तीच्या साहाय्याने त्याने घेंगट यांच्या डोक्याच्या मागे मारले रक्त वाहू लागल्याने ते खाली पडले. घेंगट यांना जखमी अवस्थेत त्यांच्या कॉलोनीतील सुकलाल कोळी, दिपक दीक्षित, कुणाल पाटील यांनी खासगी डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार केलेत. अजय घेंगट यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला किशोर कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल उमेश ठाकूर करत आहेत.