जळगाव,प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन काळात नव्याने काही नियम जळगाव महापालिका आयुक्तांनी लागू केले आहेत. यात प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सम व विषम पद्धतीने सुरु राहतील यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.
दुसरा टप्यात ५ जून पासून जळगाव महापालिका हद्दीतील मार्केट, मार्केट परिसरातील दुकानांसाठी पी १ पी २ पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम दिनांकांच्या दिवशी व दुसऱ्या बाजूची दुकाने विषम दिनांकांना उघडी ठेवता येणार आहेत. कापडातील दुकानातील ट्रायल रूम व बदलून देण्याची पॉलिसी सुरु ठेऊ नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या दुकानदाराची असणार आहे. यासोबत दुकानदारांनी फुट मार्किंग टोकन सिस्टिम, होम डिलिव्हरी आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नागरिकांनी शक्यतो जवळच्या दुकानात खरेदी करावे, दुकानात पायी जावे, अथवा सायकल वापरावी. नागरिकांना अत्यावश्यक वस्तू वगळता इतर वस्तू घेण्यासाठी दूर अंतरावरील मार्केटमध्ये जाण्यास बंदी असणार आहे. मोटराइझ वाहनांचा वापर करू नये. या नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ दुकाने, मार्केट बंद करण्यात येईल. महापालिका कार्यक्षेत्रातील बाजार संकुले व त्यातील दुकाने (मनपा मालकीचे, शासकीय निमशासकीय तसेच खासगी ) पूर्णपणे बंद राहतील. मात्र, यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहतील असे आदेश आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी काढले आहेत.