जळगाव प्रतिनिधी । कोरोना लॉकडाऊनमुळे परप्रांतीयांचा जत्था खासगी वाहनाने आपापल्या गावाकडे जात आहेत. बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशाकडे जाण्यासाठी जळगावमार्गे भुसावळकडे जात असतांना आत सकाळी आरटीओ विभागाने ७ ते ८ गाड्या पकडल्या. सर्व खासगी वाहने नवीन बसस्थानकात नेण्यात आली. मात्र याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
लॉकडाऊन काळात परप्रांतियांची मोठ्या प्रमाणावर उपासमारी होत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. आपापल्या गावाकडे जाण्यासाठी मिळेल त्या गाडीने प्रवास करत आहे. खासगी वाहनातून ३ हजार रूपये देवून गावाकडे निघालेले ७ ते ८ ट्रक व ट्राला आज आरटीओ विभागाने जळगाव शहरात दाखल होताच आकाशवाणी चौकात पकडले. ट्रकचालकावर कारवाई करत सर्व परप्रांतिय प्रवाश्यांना नवीन बसस्थानकात आणण्यात आले. याठिकाणी जिल्हा प्रशासनानतर्फे सर्वांची नावे नोंदणी करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात अचानक सात ते आठ गाड्या दाखल झाल्यानंतर एस.टी. कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अचानकपणे खासगी गाड्या बसस्थानकात दाखल झाल्यानंतर विभाग नियंत्रक श्री देवरे यांच्याशी आरटीओ विभागाचे प्रमुख श्री. लोधी यांची चर्चा केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व प्रवाश्यांची नोंदणी करून भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक श्री. देवरे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले.
भुसावळ रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेची होणार व्यवस्था
आरटीओ विभागाने सात ते आठ खासगी गाड्यांवर कारवाई केली. यावेळी जत्थाचे जत्था परप्रांतिय होते. ट्राला जणू काही जनावराप्रमाणे भरण्यात आला होता. हे दृष्य पाहून सामान्य व्यक्तीला गुदमरल्यासारखे वाटायला लागत होते. सर्वांना नवीन बसस्थानकात आणण्यात आले. सर्वांची नोंदणी करून बसेसमध्ये बसवून थेट भुसावळ रेल्वे स्थानकावर रवाना करत होते. आज दुपारपर्यंत साधारणपणे ८०० ते १००० परप्रांतियांना भुसावळपर्यंत रवाना करण्यात आले होते.
कोट –
वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शहरात येणाऱ्या सर्व खासगी गाड्या अडवून परप्रांतियांना रेल्वेने पुढील प्रवास करण्यासाठी रवाना करावे. आम्ही दिलेल्या सुचनाचे पालन करत असून आज सकाळी ७ ते ८ पारप्रांतियांना घेवून जाणारे ट्रक व ट्राला आकाशवाणी चौकात पकडून त्यांना थेट नवीन बसस्थानकात आणले आहे. नाव नोंदणी केल्यानंतर पुढील प्रवासासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर सोडण्यात येत आहे.
– श्री. लोधी, मुख्य अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन, जळगाव
परप्रांतियांनी भरलेले ट्रक आज थेट जळगाव बसस्थानकात आणण्यात आले. आरटीओ विभागाने किमान आमच्याशी समन्वय साधवा, जेणे करून बसेसची व्यवस्था करता येते, शिवाय ऐनवेळी बसचालक उपलब्ध असेल असेही नाही. दुसरी गोष्टी याठिकाणी नाहक मोठ्याप्रमाणावर गर्दी करून सोडले आहे. एक-एक गाडीतून आणल्यास नियोजन व्यवस्थीत होवू शकते.
– श्री. देवरे, विभाग नियंत्रक, मध्यवर्ती बसस्थानक, जळगाव