जळगाव प्रतिनिधी । नारायण नागबली करण्यासाठी गेलेले कुटुंबीयांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सोने-चांदीसह रोकड असा ४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शिव शंकर नगर येथे आज शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनपातील अग्निशामन विभागातील कर्मचारी पुंडलीक नामदेव सोनवणे (वय – ५०) रा. शिवशंकर नगर, कांचन नगर परिसर हे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली करण्यासाठी कुटुंबासह शुक्रवारी २० रोजी सकाळी घराला कुलूप लावून गेले होते. त्यावेळी त्यांची आई घरी एकट्याच होत्या. मात्र त्या गावातच राहणाऱ्या त्यांची मुलगी मनीषा बाविस्कर यांच्याकडे रात्री झोपण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सोनवणे यांचे बंद घर फोडून घरातील कपाट उघडून कपाटातील असलेले सोने-चांदी सह रोख रक्कम असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील किचनमधील सामानाच्या सहाय्याने कपाट उघडले असल्याचे निदर्शनास आले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या चपला तेथेच सोडून पलायन केले होते. हा प्रकार पुंडलिक सोनवणे यांच्या आई सकाळी घरी गेल्यावर उघडकीस आला. पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.