जळगाव प्रतिनिधी । खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या तरूणाच्या बँक खात्यातून मध्यरात्री ऑनलाईन व्यवहार करून २७ हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, रजत रतनलाल छाजेड (वय-२६) रा. महाबळ रोड मायादेवी नगर हे बँगलोर येथील खासगी कंपनीत नोकरीस आहे. लॉकडाऊनच्या काळात ते घरीच बसून कंपनीचे काम करत आहे. त्याचे विसनजी नगरातील बँक ऑफ बडोदा येथे खाते आहे. २३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे ते झोपले. सकाळी ६ वाजता उठल्यानंतर त्यांना दोन मॅसेज आले. त्यात त्यांच्या बँक खात्यातून १३ हजार ७७७ रूपये ऑनलाईन डेबीट झाल्याचे दोन मॅसेज असे एकुण २७ हजार ५५४ रूपये खात्यातून वर्ग झाले. हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी कोणतेही ऑनलाईन व्यवहार केले नसल्याने पैसे कोणत्या कारणासाठी गेले यांची चौकशी बँकेत जावून केली असता ई कॉमर्ससाठी ऑनलाईन ट्राझेक्शन झाल्याचे समजले. याप्रकरणी रजत यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहे.