जळगाव प्रतिनिधी । शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असणार्या दुकानासमोर आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा परिषदेजवळच्या शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असणार्या भगवती जनरल स्टोअर्स या दुकानाच्या समोर आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरूणाच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या खुणा नसल्या तरी बाजूलाच बियरची बाटली फोडलेली आहे. तसेच मृतदेहाच्या खालील बाजूस रक्त साचलेले असून त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी येथून जाणार्या काही जणांना हा मृतदेह दिसल्याने त्यांनी या संदर्भात शहर पोलीस स्थानकात याबाबतची माहिती दिली आहे.
याबाबत अजून माहिती घेतली असता असे समजले की, संबंधीत सुमारे ३० ते ३५ च्या दरम्यान वय असणारा तरूण हा काल सायंकाळी उशीरापर्यंत शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातच फिरत होता. त्याला महापालिका कर्मचार्यांनी बाहेर काढून उद्यान बंद केले होते. यानंतर त्याचा मृतदेह सकाळी आढळून आला आहे. याबाबत ताजे वृत्त हाती आले तोवर संबंधीत मृत तरूणाची ओळख पटली नव्हती.