जळगाव प्रतिनिधी । वाल्मिकनगरात एका २६ वर्षीय तरुणाने कर्जबाजारीच्या नैराश्येतून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, मुकेश उर्फ गोलु राजु सोनवणे (वय २६, रा.वाल्मिकनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुकेश हा याच परिसरात मासळी विक्रीचे काम करीत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे तो घरी झोपला होता. सोमवारी सकाळी पत्नी खोलीततन बाहेर गेल्यानंतर मुकेशने आतुन दरवाजा बंद केला. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी १० वाजता कुटुंबियांनी त्याला झोपेतून उठवण्यासाठी दरवाजा ठोठावल्यानंतर आतुन प्रतिसाद येत नव्हता. दरवाजा तोडुन उघडल्यानंतर मुकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर कुटंुबिय, शेजारच्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. सायंकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटंुबियांच्या ताब्यात देण्यात आला. मृत मुकेश याच्या पश्चात पत्नी रक्षा, आई सतीबाई, वडील राजु सोनवणे, मुलगा युवराज (दिड वर्ष) व लहान भाऊ अजय असा परिवार आहे. या घटनेमुळे सोनवणे सोनवणे कुटंुबियांना प्रचंड धक्का बसला. कुटंुबियांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. मुकेश याच्यावर काही प्रमाणात कर्ज असल्यामुळे तो तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.