जळगावात खान्देशातील मूर्तिकारांचा मोर्चाद्वारे ‘आक्रोश’ (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या निर्मिती व विक्रीविरोधात असलेली बंदी केंद्र सरकारने तत्काळ कायमस्वरूपी उठवावी या प्रमुख मागणीसाठी खान्देशातील मूर्तिकारांनी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी २० जानेवारी रोजी भव्य ‘आक्रोश’ मोर्चा काढला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी याना निवेदन दिले. मोर्चात जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या नेतृत्वाखाली सुमारे १२०० मूर्तिकारांनी सहभाग नोंदवला.

सकाळी शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मूर्तिकार एकत्र झाले. याठिकाणी महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर, प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत कुलकर्णी, अहमदनगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर,उपाध्यक्ष सुशील देशमुख, अमरावती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कोळेश्वर, नगरचे जेष्ठ मूर्तिकार नंदकिशोर रोकडे, बऱ्हाणपूर येथील अतुल वैद्य, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन, धुळेचे जिल्हाध्यक्ष राजू चित्ते, नंदुरबार संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धीची देवता श्री गणपती,राजे छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,संत गोरा कुंभार यांच्या मूर्ती पूजनाने झाली.

यावेळी प्रवीण बावधनकर म्हणाले की, केंद्राकडे व्यवस्थित माहिती न पोहोचल्यामुळे केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या निर्मिती व विक्रीविरोधात घातलेल्या बंदीविरोधात नाराजी पसरली आहे. ‘पीओपी’मुळे प्रदूषण होत नाही, शास्त्रज्ञांनी देखील सांगितले आहे. मात्र केंद्र सरकारने एकतर्फी निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेऊन सहकार्य करावे, असेही बावधनकर म्हणाले. तर हेमंत कुलकर्णी म्हणाले की, ‘पीओपी’ बंदीविरोधात सुरु झालेला लढा हा सकारात्मक निर्णय होईपर्यंत सुरूच राहणार आहे. ‘पीओपी’ वापराला हरकत नाही, असे न्यायालयाने देखील एका निकालात म्हटले आहे. मूर्तिकार आणि त्यांच्याकडील मूर्ती रंगवणारे कारागीर यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. अनेक आर्थिक व कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे., असेही कुलकर्णी म्हणाले. सूत्रसंचालन व आभार संजय जोशी यांनी मानले.

यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात भगवे झेंडे घेऊन मूर्तिकार ‘पीओपी’ वरील बंदी मागे घ्या म्हणून घोषणाबाजी करीत होते. तसेच ‘पीओपी’ तारक आहे, मारक नाही, लढाई आर या पार-आम्ही मूर्तिकार अशा घोषणांचे फलक घेऊन मूर्तिकारांनी उत्साह दाखविला. मोर्चा हा शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, टॉवर चौक, नेहरू चौक, शिवतीर्थ चौक, नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथून जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर व जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

मोर्च्यासाठी जळगाव मूर्तिकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन, उपाध्यक्ष राजू पाटील, जिल्हा सचिव किशोर महाले, धुळे संघटनेचे येथील उपाध्यक्ष संजय खरे, जिल्हा सचिव रामकृष्ण वाघ, सहसचिव सोनू वर्मा, नंदुरबार संघटनेचे सचिव बाबुलाल चौधरी यांच्यासह प्रभुलाल जयस्वाल, राकेश राणा, अजय लोहार , मुकेश जयस्वाल, अर्जुन माळी, किशोर कुंभार, योगेश कुंभार, राजू कुंभार, अनिल गुप्ता, अनिल दिवेकर, महेंद्र प्रजापती आदींनी परिश्रम घेतले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1071564466682287

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/735799527070674

Protected Content