जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर परिसरातील आर.वाय.पार्क भागात किरकोळ कारणांवरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता व रविवारी सकाळी असे दोन वेळा वाद झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एकमेकांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संगीता इश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा निरज (वय २) याने परिसरात राहणाऱ्या साहेबराव पाटील यांच्या नातूस धक्का दिला. या कारणामुळे शशिकांत पाटील, जिजाबाई पाटील, पुनमबाई पाटील व साहेबराव पाटील यांनी संगीता पाटील यांना मारहाण केली. यामुळे त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून नुकसान झाले.
तर दुसरी फिर्याद जिजाबाई साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या पती साहेबराव पाटील यांच्यासोबत घरासमोर उभ्या होत्या. यावेळी इश्वर विश्वनाथ पाटील हा त्यांच्याकडे बघत होता. साहेबराव पाटील यांनी माझ्याकडे का बघतो ? असे विचारल्याचा राग आल्यामुळे विश्वनाथ पाटील याच्यासह संगीता पाटील व दीपक पाटील यांनी जिजाबाई पाटील, साहेबराव पाटील व शशिकांत पाटील यांना मारहाण केली. यात जिजाबाई पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून नुकसान झाले. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनांमुळे आर.वाय.पार्क परिसरात तणाव निर्माण झाला होता. रविवारी शहर पोलिस ठाण्यात देखील गर्दी झाली होती.