जळगाव परिमंडळात आठ महिन्यांत पाच हजारांवर वीजचोरीची प्रकार उघड!

जळगाव प्रतिनिधी* | जळगाव परिमंडलात गेल्या आठ महिन्यांत वीजचोरी करणाऱ्या ५१०३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांनी ५५ लाख ९ हजार ५७४ युनिटची म्हणजे ७ कोटी ५३ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. यामुळे वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणतर्फे सातत्याने मोहिमा राबविण्यात येत आहेत. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात एप्रिल-२०२१ ते नोव्हेंबर -२०२१ या आठ महिन्यांत मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात जळगाव जिल्ह्यात ३६८० प्रकरणांत ४१ लाख ५२ हजार ६१० युनिटची ५ कोटी ४२ लाख, धुळे जिल्ह्यात ८०३ प्रकरणांत ६ लाख ५९ हजार ७०७ युनिटची ९१ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ६२० प्रकरणांत ६ लाख ९७ हजार २५७ युनिटची १ कोटी २० लाख रुपयांची वीजचोरी महावितरणच्या मोहिमांत निदर्शनास आली. एकूण ५१०३ प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची २०१ प्रकरणे उघडकीस आली. आकडा टाकून थेट वीज चोरल्याची २२२६ प्रकरणे तर मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याची २६७६ प्रकरणे आहेत. या सर्व ग्राहकांना ७ कोटी ५३ लाख रुपये वीजचोरीची बिले देण्यात आली.

*बिले न भरणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हे*

दरम्यान, ५१०३ प्रकरणांपैकी केवळ १३९७ प्रकरणांमध्ये ग्राहकांनी वीजचोरीची बिले व तडजोड शुल्क भरले आहे. ज्या ग्राहकांना महावितरणने वीजचोरीची बिले दिली आहेत, त्यांनी ती तातडीने भरावीत. अन्यथा या ग्राहकांविरोधात थेट पोलिसांत गुन्हे नोंदवले जातील, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. गेल्या आठ महिन्यांत ३८ प्रकरणांमध्ये महावितरणने गुन्हे नोंदवले आहेत. वीजचोरीविरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊन विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Protected Content