जळगावातील रस्ते दुरूस्त करा; अथवा तीव्र आंदोलन- काँग्रेसचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून तातडीने रस्ते दुरूस्त करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा व महानगर काँग्रेसतर्फे आज महापालिका आयुक्तांना एका निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.

आज जिल्हा काँग्रेसतर्फे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील,चोपडा तालुका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील,गटनेते प्रभाकर सोनवणे उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की,जळगाव शहरातील अनेक मुख्य व उपनगरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे वाहन धारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठया खड्डयांमुळे व धुळीमुळे श्‍वसनाचा त्रास, मान, पाठ, कंबरदुखी असे त्रास होऊ लागले आहेत. उपनगरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे.यामुळे शहरातील बहुतेक रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढल्याने शहरात सर्वत्र ओरड होत आहे. तर, खड्डे बुजविण्याच्या सूचना देउन देखील काम झालेले दिसून येत नाही. सर्वत्र नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून याकडे महापौर यांनी त्वरीत लक्ष द्यावे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती कडे महानगर पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा जळगाव महानगर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने या निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर शामकांत तायडे, ज्ञानेश्‍वर कोळी, नदीम काझी, जमील शेख, मुजीब पटेल, देवेंद्र मराठे, मनोज सोनवणे, प्रदीप सोनवणे,नंदकिशोर सांगोरे व साहेबराव पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content