जळगावातील मेहरुण तलावात तरुणाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीने कामानिमित्त बाहेर पडलेल्या तरूणाचा मृतदेह शहरातील मेहरूण तलावात आढळून आला. नेमकी आत्महत्या की घातपात असा प्रश्न पोलीसांना पडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, फुले मार्केटमध्ये कॉस्मेटीकच्या दुकानात काम करणारा लक्ष्मण सुपडू निसळकर (वय-३५) रा. तुकाराम वाडी या तरुणाने मेहरूण तलावात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सेंट टेरेसा शाळेच्या पाठीमागे तलावात लक्ष्मणचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बीट मार्शन इम्रान सय्यद, मुदस्सर काझी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता लक्ष्मणचा मृतदेह पाण्यात तर त्याची दुचाकी (क्र. एमएच १९ डीजे ६६५४) तलावाच्या काठावर रस्त्यावर होती. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला, तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. लक्ष्मणच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, लक्ष्मण तलावात बुडाला की आत्महत्या आहे, किंवा घातपात आहे. याबाबत नातेवाईकही गोंधळात आहेत. सकाळी ८.३० वाजता तो घरातून बाहेर पडला. बेळी, ता.जळगाव येथील मुळ रहिवाशी होता. त्याच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा लकी, अजय असा परिवार आहे. आई, वडीलांचे निधन झालेले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content