जळगाव प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयातील दोन खोल्यांना रात्री लागलेल्या आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर रात्री उशीरा नियंत्रण मिळवण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री अकराच्या सुमारास तहसील कार्यालयातील इमारतीतून धुर निघत असल्याचे जि.प.च्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. साधारणत: एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत दोन खोल्यांमधील संगणकांसह फाईल्स जळून खाक झाल्या. दरम्यान, आगीची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे, नायब तहसीलदार सी.एम.सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.