सावदा ता.रावेर प्रतिनिधी । जळगावच्या कोविड रूग्णालयात कोरोनाबाधित तरूण उपचार घेत असतांना तेथून सावद्यात पळून आला होता. याप्रकरणी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम १८८ प्रमाणे सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी शहरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळून आला होता. पॉझिटीव्ह निष्पन्न झाल्यानंतर त्याला जळगावच्या कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार सुरू असतांनाच तो रूग्णालयातून पळून साळीबाग जवळच्या गणपती मंदिराजवळच्या आपल्या भावाच्या घरी पळून आला होता. येथे त्याने दोन दिवस मुक्काम ठोकला होता. तर, दुसरीकडे पॉझिटीव्ह रूग्णाने पलायन केल्याने धास्तावलेल्या आरोग्य यंत्रणांनी त्याचा माग काढला. या व्यक्तीला रूग्णवाहिकेतून पुन्हा कोविड रूग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान या तरूणावर नियमांचे उल्लंघन, कोरोनाबाधित असतांना पळून जाणे यासाठी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.