जळगावच्या देवेशची “बालशक्ती’ पुरस्कारासाठी निवड

News1

जळगाव प्रतिनिधी । येथील एल.एच.पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमधील सातवीचा विद्यार्थी देवेश भैय्या या विद्यार्थ्याची भारत सरकारच्या “बालशक्ती’ पुरस्कारासाठी निवड झाली. दिल्ली येथे उद्या 22 जानेवारी राष्ट्रपती भवनात महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्याहस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या श्रेणीतील पुरस्काराचा जिल्ह्याला प्रथमच बहुमान प्राप्त होत आहे.

भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. नावीन्य, शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणिशौर्य अशा सहा विभागातून त्यांची निवड करण्यात येत असते. देवेश भय्या याची शैक्षणिक या विभागातून पुरस्कारासाठी निवड झाली असून त्याने आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक स्पर्धा परिक्षा व प्रकल्पांमध्ये 250 पेक्षा अधिक पारितोषिके व पुरस्कार प्राप्त केले आहे. बालपणापासून कुशाग्र बुद्धीमत्ता असणारा देवेश हा आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटेरिअर डिझाईनर पल्लवी भय्या यांचा मुलगा आहे. अवघ्या बाराव्या वर्षी देवेशला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्विकारण्याची संधी प्राप्त झाली असून जिल्ह्याचा या निमित्ताने प्रथमच सन्मान होत आहे.

सात दिवशी विशेष अतिथी 21 ते 27 जानेवारीपर्यंत देवेशला केंद्रशासनाच्यावतीने विशेष अतिथीचा दर्जा देण्यात आला आहे. पुरस्कारानंतर विशेष सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत संवाद व भोजनाची संधी देखील पंतप्रधान निवासस्थानी देवेशला लाभली आहे. भारत सरकारच्यावतीने लाल किल्ला मैदानावर दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात देवेश भय्या व त्याच्या आई-वडिल यांना अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. एवढ्या कमी वयात देवेशला मिळालेल्या सन्मानाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी सोमवारी (ता.20) रात्री देवेश व त्याचे कुटुंबीय रवाना झाले.

Protected Content