जळगावचे सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट

Ujjwal Nikam

मुंबई, वृत्तसंस्था | जळगाव येथील रहिवासी आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ तसेच अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडणारे वकील अॅड.उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ओह माय गॉड’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या बायोपिकच्या माध्यमातून निकम यांच्या जीवनातील कधीही न दिसलेली बाजू लोकांसमोर येणार आहे.

 

अॅड. निकम यांनी आजवर अनेक महत्त्वाचे खटले लढले असून त्यात यशही मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय उमेश शुक्ला यांनी घेतला आहे. या चित्रपटाचं नाव ‘निकम’ असे ठेवण्यात येणार असून चित्रपटाच्या कथेचे लेखन भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला करणार आहेत.

“गेल्या कित्येक वर्षांपासून मी एखादं पुस्तक लिहावं किंवा माझा बायोपिक यावा, अशी काहींची मागणी होती. मात्र मला ते मान्य नव्हते. माझ्या जीवनावर चित्रपट यावा, अशी माझी इच्छा नाही आणि तेवढा वेळही नाही. माझ्यावर अनेक खटल्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. परंतु माझ्याकडे या चित्रपटाची टीम आली आणि त्यांची संकल्पना मला पटली. कदाचित या चित्रपटातून अशी एखादी कथा प्रेक्षकांसमोर सादर होईल की ज्यातून लोक प्रेरणा घेतील. त्यामुळे या चित्रपटासाठी मी तयार झालो”, असे निकम यांनी या संदर्भात म्हटले आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना उमेश शुक्ला म्हणाले की, “आम्ही अशा एका व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट तयार करत आहोत, ज्यातून प्रेरणा मिळेल. समाजात हिरो फक्त स्टाइल करणारेच असतात असे नव्हे. तर काही हिरो हे खऱ्या आयुष्यात त्यांच्या कार्यामुळे ठरत असतात. उज्ज्वल निकम तसेच आहेत”.
अॅड. निकम यांनी दहशतवादी अजमल कसाब, कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरण, मोहसिन हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण हे गाजलेले खटले लढवले आहेत तर उमेश शुक्ला यांनी ‘ओह माय गॉड’, ‘102 नॉट आऊट’ या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Protected Content