जळगाव : (राहुल शिरसाळे) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नसल्याची भूमिका घेऊनही जळगावकरांनी मात्र, एनआरसीचा मोठा धसका घेतल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून अचानक नागरिकत्वाचे पुराव्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात गर्दी वाढली आहे. याठिकाणी दररोज अक्षरश: रांगा लागत असून मागील तीन महिन्यात दाखल्यांच्या मागणीत पाचपटीने वाढ झाली आहे. तर अनुपलब्धता दाखल्याच्या मागणीत धक्कादायकरित्या ७०० पटीने वाढ झालीय.
दिवसाला सरासरी वाढून ४०० ते ५०० दाखल्यांचे वाटप
मागील तीन महिन्यांपासून वाढलेली गर्दी बघता २ संगणक चालक, २ रजिस्टर नोंदणी लिपिक व २ शिपाई यांची नितांत गरज असतांना या विभागातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत आहे. तीन महिन्यांपूर्वी जन्म-मृत्यू दाखला दिवसाला सरासरी १०० ते १२५ दिले जात होते. आज याचे प्रमाण वाढून ४०० ते ५०० यावर गेले आहे.
तर अनुपलब्धता दाखल्याच्या मागणीत ७०० पटीने वाढ
जन्म-मृत्यू विभागात नोंद नसलेल्या व्यक्तींना अनुपलब्धता दाखल दिला जातो. यानंतर हा दाखला मिळविण्यासाठी कोर्टात जावे लागते. कोर्टाच्या आदेशानंतर दाखला दिला जातो. तीन महिन्यांपूर्वी अनुपलब्धता दाखला आठवड्यातून साधारण एखादं व्यक्ती घेवून जायचा. परंतू मागील तीन महिन्यात त्याचा आकडा दिवसाला १०० म्हणजेच आठवड्याला ७०० च्या वर गेला आहे.
महापालिकेची तोकडी यंत्रणा
जन्म मृत्यू दाखल्याच्या मागणीत वाढ झलेली असतांना विभागातील ११ कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. सकाळी कार्यालय उघडल्यापासून दाखल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली असते. या गर्दीला सांभाळ्यासाठी कर्मचारी अपूर्ण पडत आहेत. २ लिपिक व १ शिपाईसाठी उपयुक्त व आस्थापना विभागाकडे वारंवार टिपणी सादर करून देखील कर्मचारी वाढविण्यात आलेले नाहीत. हि टिपणी १० ऑगस्ट २०१८, २९ ऑगस्ट २०१८, १२ फेब्रुवारी २०१९, १ जानेवारी २०२० व २४ फेब्रुवारी २०२० सादर करण्यात आलेली आहे. परंतु, प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. या विभागातून बदली व सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे.
निबंधकाच्या स्वाक्षरीसाठी नागरिकांची वणवण
दाखला मिळविण्यासाठी सकाळ पासून लांबच लांब रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना जेव्हा दाखला हातात मिळतो, तेव्हा पुन्हा त्यांना निबंधकांच्या स्वाक्षरीसाठी वाट पाहावी लागते. थोडक्यात जळगावकरांनी घेतला ‘एनआरसी’चा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे.
लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2733793166656636