जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोर्ट परिसरातील रस्त्याने फिरत असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला रविवार, २ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जयेश ऊर्फ बंटी शांताराम कोळी (वय २२) रा. पवार नगर, चोपडा असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी चोपडा शहरातील दुचाकी चोरीच्या तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी पोलीस नाईक रविंद्र पाटील, दिपककुमार शिंदे या कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले. चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जयेश कोळी हा सध्या चोपडा शहरात कोर्ट परिसरातील रस्त्याने फिरत असल्याची गोपनीय माहिती रविवारी २ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्यास अटक करत चोपडा शहर पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.