जळगाव प्रतिनिधी । जनसंग्राम ठेवीदार संघटनेतर्फे कायदेभंग करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. सहकार खात्याने येत पंधरा दिवसांत ठेवी परत करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत वृत्तांत असा की, जनसंग्राम बहुजन लोकमंच प्रणीत महाराष्ट्र राज्य ठेवीदार समितीचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ठेवीदारांनी ठेवीच्या तत्काळ परताव्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन केले. जोपर्यंत ठेवी परत करण्याच्या ठोस उपाययोजना होत नाहीत. तोपर्यंत जामीन न घेता तुरुंगातच राहण्याचा पावित्रा ठेवीदारांनी घेतला होता.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधक एम. यू. राठोड व इतर अधिकार्यांनी आंदोलक ठेवीदारांशी ठेवी या तत्काळ परताव्याच्या उपाययोजनांवर चर्चा करून ५ फेब्रुवारीपर्यंत कर्ज वसुलीच्या प्रमाणात ठेवीदारांना थेट धनादेश देण्याचे व इतर मागण्यांबाबत पंधरा दिवसात मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.