नवी दिल्ली । रविवार दिनांक २२ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्युच्या दरम्यान देशभरात एकही रेल्वे गाडी चालणार नसल्याचे आज घोषीत करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला केलेल्या संबोधनामध्ये रविवार दिनांक २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. यात नागरिकांनी स्वेच्छेने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा अघोषीत बंद पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने २१ मार्चची मध्यरात्र ते २२ मार्च रात्री दहा वाजेपर्यंत तब्बल २२ तासांसाठी एकही प्रवासी रेल्वे गाडी न चालविण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा बंद पाळण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवार अर्थात २२ मार्च रोजी सकाळी सात वाजेपर्यंत ज्या रेल्वे प्रवासी गाड्या आपल्या विहीत ठिकाणी पोहचणार आहेत त्या मात्र धावणार आहेत. याचा अपवाद वगळता अन्य रेल्वे गाड्या पूर्णपणे थांबणार आहेत. दरम्यान, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता आदींसारख्या महानगरांमधील उपनगरीय रेल्वे सेवा ही कमीत कमी प्रमाणात सुरू असेल असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.