नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठा ‘अटल बोगद्याचे’ आज हिमाचल प्रदेशातील रोहतंग येथे उद्घाटन केले. याचा हिमाचल प्रदेशातील जनतेला फायदा होईलच, भारतीय लष्कराला रसद पुरवणे व चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे सोपे होणार आहे . .
या बोगद्याची लांबी ९.०२ किलोमीटर आहे. या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या बोगद्यामुळे मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने कमी झाले आहे. संपूर्ण प्रवासाचा वेळ पाच तासांनी कमी होणार आहे. आता वर्षभर लाहोल स्पिती खोऱ्याशी संपर्क सुरू राहणार आहे. या पूर्वी हिमवर्षावामुळे या खोऱ्याचा संपर्क सहा महिन्यांसाठी तुटलेला असायचा.
उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी हिमाचलमध्ये घालवलेल्या दिवसांची स्मृती जागवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत मोदी नेहमीच येथे येत असत. आज केवळ अटलबिहारी वाजपेयी यांचेच स्वप्न पूर्ण झाले नसून, हिमाचल प्रदेशातील कोट्यवधी लोकांची दशकांपासूनची प्रतीक्षा संपलेली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.