नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी खुल्या बाजारात खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्डचे नवे दर जाहीर केले असून त्यानुसार आता खासगी रुग्णालयांना कोविशिल्ड लसीच्या प्रत्येक डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.ही किंमत जगभरात कोविशिल्ड लस ज्या ज्या देशांमध्ये दिली जात आहे, त्यात सर्वाधिक असणार आहे.
देशात लसीकरण सुरू झाल्यामुळे कोरोनाविरोधातल्या लढ्याला मोठं बळ मिळालं आहे. प्रारंभी पुण्यातल्या सिरमकडून उत्पादित केली जाणारी कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन लसींनाच देशांतर्गत वापराला मान्यता देण्यात आली होती. आत्तापर्यंत देशात लसीकरणासाठी कोविशिल्डचाच वापर करण्यात आला आहे. येत्या १ मे पासून लसीचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या व्यक्तींना लस घेण्याची परवानगी देत लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर फायझर, मॉडेर्ना, स्पुटनिक व्ही अशा परदेशी लसींना देखील भारतात वितरणाची परवानगी देण्यासाठी पावलं उचलण्यात आली. त्यानंतर सिरम यांनी देखील सिरमच्या कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर केले. आत्तापर्यंत १५० रुपयांमध्ये कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारला घ्यावा लागत होता. आता तीच किंमत राज्य सरकारांसाठी ४०० रुपये प्रतिडोस इतकी होणार असून खासगी रुग्णालयांसाठी ती किंमत ६०० रुपये प्रतिडोस असणार आहे.
अमेरिका, ब्रिटन, युरोपातील काही देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका या भागात कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, भारतातील नव्या दरांनुसार लसीचा एक डोस आंतरराष्ट्रीय दरांनुसार ८ डॉलरपर्यंत जाणार आहे. जगात कुठेही कोविशिल्ड लसीच्या डोसची इतकी किंमत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. यापैकी बहुतेक देशांमध्ये लस मोफत दिली जात असून त्याचा खर्च तेथील सरकार उचलत आहे. सध्या युरोपातील देशांमध्ये कोविशिल्डच्या एका डोससाठी २.२५ ते ३.५० डॉलर, ब्राझीलमध्ये ३.१५ डॉलर, ब्रिटनमध्ये ३ डॉलर तर अमेरिकेत ४ डॉलर इतकी किंमत मोजली जात आहे. अमेरिका आणि ब्रिटनकडून थेट AstraZeneca कडून लसीचे डोस घेतले जात आहेत.
भारतात परदेशी लसी विकत घेण्यासाठी अत्यंत महाग असल्याची प्रतिक्रिया दोनच दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. लसीचे डोस अपुरे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातल्या सधन नागरिकांना लस विकतच घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासोबतच राज्यातील गरीब जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असून लवकरच त्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.