नवी दिल्ली : वृत्तसंस्था । छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसामचा दौरा रद्द केलाय. अमित शाह हे आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यावर होते
नक्षल प्रभावित बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. सुरक्षा दलाला बेपत्ता झालेल्या 17 जवानांचे मृतदेह मिळून आले.
. आज शाह यांच्या 3 प्रचार रॅली होणार होत्या पण त्यातील एकच रॅली पार पडली. त्यानंतर पुढील कार्यक्रम रद्द करुन शाह दिल्लीला परतले आहेत.
शनिवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जोनागुडा गावात हा नक्षलवादी हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आसामचा दौरा रद्द केलाय. या हल्ल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी शाह दिल्लीला परतले आहेत.
बिजापूर, सुकमा आणि कांकेर येथे नक्षलवाद्यांकडून सातत्याने कँप लावले जात होते. या कँपमध्ये सुमारे 200 ते 300 नक्षलवादी सहभागी होत होते. तर सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचे डिव्हिजनल कमांडर छत्तीसगडच्या बिजापूर कँम्पमध्ये राहत होते. बिजापूरमध्ये आयईडी प्लांट करण्याची नक्षलवाद्यांची योजना होती, अशी माहितीही समोर येत आहे.
डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.