चोपडा प्रतिनिधी । शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या बी.फ़ार्मेसी महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे पुढील वर्षाकरिता विनाअनुदानित डी-फार्मसी महाविद्यालयाची परवानगी मिळाली आहे.
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालीत बी.फार्म औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय हे १९९२ साली चालू झालेले आहे. महाविद्यालयामध्ये बी फार्मसी, एम फार्मसी तसेच पीएचडी चा अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने पीसीआय व AICTE न्यू दिल्ली यांच्या परवानगीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत कार्यरत आहे. तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळ यांचे अनुदानित तत्वावर महाराष्ट्र शासनाचा ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे डी-फार्मसी महाविद्यालय कार्यरत आहे. औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय चोपडा यांनी नवीन विनाअनुदानित तत्वावर डी फार्मसीसाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली (पीसीआय)यांच्याकडे अर्ज सादर केलेला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या मार्फत महाविद्यालयाचं इन्स्पेक्शन करण्यात आलेले होते. महाविद्यालयात उच्च दर्जाचं क्लासरूम व उत्तम प्रतीचे प्रयोगशाळा(लॅब), तशेच प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररी आणि सोबत अनुभवी व उच्च शिक्षित पूर्ण क्षमतेने असलेला शिक्षक वर्ग. या सगळ्या बाबींचा विचार करता फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) न्यू दिल्ली यांनी सन २०२०-२१ करिता ६० विद्यार्थी प्रवेश समतेची परवानगी या महाविद्यालयाला देण्यात आलेली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना डी फार्मसी साठी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम प्रकाश वडनेरे यांच्याशी संपर्क साधावा. नवीन डी-फार्मसीच्या अभ्यासक्रमा साठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.