चोपडा प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे जगभर पसरलेल्या आजारामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन उपासमार टाळण्यासाठी त्यांच्या जेवणाची सोय येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागात राहणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घरापर्यंत, वस्तीपर्यंत पोहोचून फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अन्नाची पाकिटे वितरित केली. सुमारे ३०० जणांपर्यंत ही अन्नाची पाकिटे व्यवस्थित पोहचवण्यात आली. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी विविध सेवांमध्ये व्यस्त असलेल्यांचा देखील यावेळी विचार करण्यात येऊन त्यांनादेखील अन्नाची पाकिटे कार्यकर्त्यांनी वितरित केली. या उपक्रमाचा शुभारंभ नगर परिषदेचे गटनेते जीवन चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शहरातील हेमलता नगर, परीस पार्क, महालक्ष्मी नगर, शरदचंद्रिका पाटील कॉलनी, कारगील चौक या परिसरात झोपड्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना ही पाकिटे वितरित करण्यात आली. शहरातील काही दानशूर व्यक्तींनी देखील या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केलेला आहे. २७ रोजीच्या जेवणासाठी चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी आर्थिक सहकार्य केले.
यांची होती उपस्थिती
प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जाधव, उपाध्यक्ष डॉ. निर्मल जैन, सचिव लतिश जैन, सहसचिव संजय बारी, हिरेंद्र साळी, विश्वास वाडे, अतुल पाटील, निलेश जाधव, अॅड. अशोक जैन, आकाश जैन हे याकामी परिश्रम घेत आहे.