चोपडा प्रतिनिधी । येथील ललीत कला केंद्राचा विद्यार्थी निखील कोळी याला राज्य कला प्रदर्शनात द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याबाबत वृत्त असे की, येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र या कला संस्थेत कला शिक्षक पदविका (ए.टी.डी.) द्वितीय वर्षातील निखिल छन्नू कोळी (बोरअजंटी) या विद्यार्थ्यास ६०वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात (विद्यार्थी विभाग ) द्वितीय क्रमांकाचा रुपये ७५००/- रोख व प्रमाणपत्र पुरस्कार औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्याचे कला संचालकराजीव मिश्रा यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उदघाटक नंदकुमार घोडेले,(महापौर औरंगाबाद), शिक्षक आमदार विक्रम काळे, डॉ. रविंद्र सिंघल, (विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद), सत्कारमूर्ती प्रा. केशव मोरे यांच्यासह डॉ.संतोष क्षिरसागर, (अधिष्ठाता सर जे.जे. स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्ट मुंबई), प्रा.रमेश वडजे,(अधिष्ठाता, शासकीय अभिकल्प व कला महाविद्यालय, औरंगाबाद) प्रो. मानकर (अधिष्ठाता, शासकीय अभिकल्प व कला महाविद्यालय,नागपूर), प्रा.विनोद दांडगे, (उपकला संचालक, (प्रशासन) महाराष्ट्र राज्य मुंबई), प्रा.भास्कर तिखे, (निरीक्षक चित्र व शिल्प महाराष्ट्र राज्य मुंबई), प्रदर्शन अधिकारी प्रा.संदीप डोंगरे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातील उच्च कला शिक्षण देणार्या कला संस्थेमधील आठ विभागातून कलाकृती निवडल्या जातात व ३१ रोख पारितोषिके प्रदान केली जातात. निखिल कोळी यांचा संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनमबेन गुजराथी,सचिव सौ.उर्मिलाबेन गुजराथी, सहसचिव सौ. अश्विनी गुजराथी, प्राचार्य राजेंद्र महाजन व प्रा. आशिष गुजराथी यांनी अभिनंदन केले आहे. निखिल याला वर्ग शिक्षक प्रा. विनोद पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.