चोपडा, प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने चोपडा शहरातील गरीब व गरजू कुटंबांना धान्य वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अर्थात मोलमजुरी करून रोज उदरनिर्वाह करणार्या कुटंबांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था अशा गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलेल्या आहेत. मानवतेसमोरील निर्माण झालेल्या संकट काळात आपण देखील आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे या उद्देशाने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रित येऊन स्वेच्छेने वर्गणी जमा करून जिवनावश्यक तांदूळ, दाळ, मिठ, मिरची या धान्याची पाकिटे तयार करून ती गरजू व उघड्यावर संसार असणाऱ्या कुटुंबांना वितरित करण्यात आली. स्वच्छतेसाठी साबण देखील देऊन स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील रेड लाईट एरिया, ओम शांती नगर परिसर, कारगील चौक, देशमुख नगर परिसरातील शंभर कुटंबांना मदत वाटप करण्यात आली. प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए. एल. चौधरी, डॉ. व्ही. टी. पाटील, प्रा. एन. एस. कोल्हे, प्रा. बी. एस. हळपे, प्रा. व्ही. वाय. पाटील,रजिस्ट्रार डी. एम. पाटील यांनी मार्गदर्शन केले. मदत वाटपाचे नियोजन डॉ. शैलेश वाघ व प्रा. ए. बी. सूर्यवंशी यांनी केले. त्यांना प्रा. अभिजीत साळुंखे, प्रा. प्रमोद पाटील, प्रा. मुकेश पाटील व प्रा. भूषण पवार यांनी सहकार्य केले.