चाळीसगाव, प्रतिनिधी | विविध शासकीय योजनेअंतर्गत गावात विकासकामे केल्याबद्दल तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला नुकतीच आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने बीडीओ वाळेकर यांच्या हस्ते सरपंच अनिता राठोड यांना सदर सन्मानपत्र देण्यात आले.
तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने गावात विविध विकासकामे केल्याबद्दल ग्रामपंचायतीला नुकतीच आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. दरम्यान हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून चैतन्य तांडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी आयएसओ मानांकनचे सन्मानपत्र सरपंच अनिता दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड यांना प्रदान केले. तसेच यावेळी युनिव्हर्सल पासचे वाटप करण्यात आले. तालुक्यात आदर्श गाव निर्माण करण्यासाठी दोन गावांची निवड झाली आहे. त्यात चैतन्य तांड्याचा समाविष्ट आहेत. त्यामुळे अल्पावधीतच चैतन्य तांड्याने गाठलेले हे शिखर खरंच वाखाणण्याजोगे आहे. यामुळे येणाऱ्या काळात गावाचा अधिक विकास व्हावा यादृष्टीने ३० वर्षाचे नियोजन करू. व या गावाला राज्यात ओळख कशी निर्माण करता येईल यासाठी मी पूर्णपणे मदत करेल असे प्रतिपादन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले. पुढे म्हणाले की, गावात नवनवीन उपक्रम राबविणे, लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे, डासमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम, शौचखडे करून पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेला गती देणे, शंभर टक्के कर वसुली, कोरोनाच्या काळात पहिला व दुसरा डोस पूर्ण करण्यात अग्रेसर, विनामस्क धारकांवर दंडात्मक कारवाई या सगळ्या गोष्टींमुळे ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाला असल्याचेही बीडीओंनी सांगितले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी माळी, ग्रामसेवक कैलास जाधव, सरपंच अनिता दिनकर राठोड, उपसरपंच आनंद राठोड, ग्रामपंचायत सदस्य अनिता चव्हाण, यशोदा चव्हाण, अरुणा संदीप राठोड, पवार गोरख राठोड, कैलास राठोड, ग्रामस्थ खिमा राठोड, ममराज राठोड आदी उपस्थित होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी चेअरमन दिनकर राठोड तर सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले.