चीनी अॅपने भारतीयांना घातला २५० कोटींचा गंडा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । उत्तराखंडमध्ये एका चिनी अॅपच्या माध्यमातून २५० कोटींची फसवणूक केल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे.  पोलिसांनी नोएडा भागातून एका आरोपीला अटकही केली आहे.

 

या आरोपीने चार महिन्यांच्या काळात ही रक्कम चोरली असल्याचं पोलिसांकडून कळत आहे.

 

चीनच्या एका स्टार्टअप योजनेअंतर्गत तयार झालेल्या एका अॅपने लोकांना गंडा घातला आहे. देशातल्या जवळपास ५० लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं होतं. या अॅपच्या माध्यमातून लोकांना १५ दिवसात पैसे दुप्पट होणार असल्याचं आमिष दाखवलं जात होतं. पैसे दुप्पट होतील असं सांगून लोकांना आधी पॉवर बँक हे अॅप डाऊनलोड करायला सांगितलं जायचं आणि त्यानंतर तुमचे पैसे आता १५ दिवसांमध्ये दुप्पट होतील असं आमिष दाखवलं जायचं.

 

हरिद्वारचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने जेव्हा पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. या फिर्यादीने सांगितलं की त्याने पैसे दुप्पट होतील म्हणून या अॅपमध्ये दोन वेळा अनुक्रमे ९३ हजार आणि ७२ हजार अशी रक्कम जमा केली होती. मात्र, हे पैसे दुप्पट न झाल्याने या व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्याच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

 

तपासादरम्यान समोर आलं की ही सगळी रक्कम वेगवेगळ्या बँकखात्यांमध्ये जमा करण्यात आली होती. जेव्हा या सगळ्या खात्यांच्या व्यवहारांबद्दल माहिती घेतली, तेव्हा असं लक्षात आलं की एकूण २५० कोटी रुपयांची फसवणूक या अॅपच्या माध्यमातून झाली आहे.

 

Protected Content