बीजिंग: वृत्तसंस्था । कोरोना लशीला अद्याप मंजुरी मिळाली नसतानाही त्याचा काळाबाजार सुरू झाला आहे.
चीनमध्ये कोरोना लस मिळवण्यासाठी अनेकजण आटापिटा करत आहेत. जुलै महिन्यात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेल्या लस कंपनीने सरकारकडे लस बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र, त्याआधीच लशीचा काळाबाजार सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सध्या ही लस फ्रंटलाइन वर्कर्स यांना दिली जात आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
एका पत्रकाराने काळाबाजारूतून , नियमांचे उल्लंघन करून लस घेतलेल्या जवळपास १२ जणांसोबत चर्चा केली. त्यापैकी चेंग याने कोल्ड चेन लॉजिस्टिक्समध्ये काम करणाऱ्या मित्राकडे त्यांच्या कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून लस उपलब्ध करून देण्याची विनंती केली. चेंग याला अमेरिकेत जाण्यापूर्वी ही लस टोचून घ्यायची आहे. त्याशिवाय, बीजिंगमधील अनेकांनी गुआंडोंग प्रांतात जाण्याची तयारी सुरू केली आहे. या ठिकाणी सिनोफार्म लशीचे दोन डोस ९१ डॉलरमध्ये (जवळपास ६७०० रुपयांना) उपलब्ध आहे.
पाश्चिमात्य देशांनी लस चाचणीचा डेटा जाहीर केला आहे. मात्र, चीनने आपल्या लस चाचणीचा डेटा अद्यापही जाहीर केला नाही. त्यामुळेच त्यांची लस किती प्रभावी आणि सुरक्षित आहे, याबाबत काही ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, तरीदेखील अनेकजण लस मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कोणत्याही आजाराची साथ आल्यास अनेकजण आपले हितसंबंध वापरून, पैसे खर्च करून, लाच देऊन चांगले औषधोपचार, व्यवस्था मिळवण्याचा प्रयत्न करतात. याआधीदेखील अशाच प्रकारे अनेकांनी आरोग्य सुविधेचा फायदा घेतला असल्याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. असमान वाटप, वितरण झाल्यास समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लस विकसित झाल्यानंतर त्याचे योग्य वितरण होणे ही जगासमोर आव्हान आहे.