*नवी दिल्ली वृत्तसंस्था* पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सैन्याची जमवाजमव केली आहे याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या का वक्तव्याचा संदर्भ देत सरकारला टोला लगावला आहे. चीन आपली जमीन घेत आहे आणि पुन्हा ती ताब्यात घेण्यासाठी आपल्या सरकारकडे मात्र काहीच योजना नाहीय असा टोला राहुल यांनी ट्विटरवरुन लगावला आहे. “चीनने आपल्या भूभागावर मिळवलेला ताबा सुद्धा अॅक्ट ऑफ गॉड आहे का? ” असे ट्विट राहुल यांनी केलं आहे.
२७ ऑगस्ट रोजी वस्तू व सेवा कर परिषदेमध्ये निर्मला सितारामन यांनी अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना अॅक्ट ऑफ गॉडचा उल्लेख केला होता. चिनी सैन्य मेपासून फिंगर ४ पर्वतरांगांजवळ तळ ठाकून आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठापासून ते ‘रेझांग ला’ जवळच्या ‘रचिन ला’पर्यंतच्या मार्गावरील उंच ठिकाणांवर भारतीय लष्कराने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणांवर ताबा मिळविण्याचा आता चीनचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.
चीनने संपूर्ण सैन्यमाघारीची तयारी दर्शवली होती. मात्र, चिनी सैन्याने फिंगर ४ पर्वतरांगांतून कधीच माघार घेतलेली नसून, त्यांनी या पर्वतरांगांच्या वरील भागात सुमारे २ हजार सैनिकांची जमवाजमव केली आहे दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान फक्त ४००-५०० मीटरचे अंतर असल्याचे सूत्रांनी सांगितले.