इटानगर वृत्तसंस्था । अरुणाचल प्रदेशातील सीमेवर चिनी सेनेकडून पाच भारतीयांचे अपहरण करण्यात आल्याचं समोर येतंय. काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी हा धक्कादायक खुलासा केलाय. शनिवार सोशल मीडियाद्वारे त्यांनी पाच भारतीय नागरिक बेपत्ता असून त्यांचं चिनी सैनिकांकडून अपहरण करण्यात आल्याचं म्हटलंय.
एरिंग यांच्या म्हणण्यानुसार, सुबनसिरी जिल्ह्यातील पाच भारतीय नागरिकांचं कथितरित्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून अपहरण करण्यात आलंय. काँग्रेस आमदारांनी पंतप्रधान कार्यालयाला आपल्या ट्विटमध्ये टॅग करताना पीएलए आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनला याबद्दल सडेतोड प्रत्यूत्तर दिलं जायला हवं, असं म्हटलंय.
‘द अरुणाचल टाइम्स’मध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार, अपहरण करण्यात आलेले पाच लोक तागिन समुदायाशी संबंधित आहेत. हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांकडून ताब्यात घेण्यात आले.
अपहृत नागरिकांच्या एका नातेवाईकानं ही माहिती दिलीय. ज्या लोकांचं अपहरण करण्यात आलंय त्यांची नावं टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी आहेत. पीडित कुटुंबीयांनी शनिवारी भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं समजतंय.