अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातमधील एकूण रुग्णांपैकी ५९ टक्के रुग्ण अहमदाबादमधील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रेड हॉटस्पॉट झोनमध्ये सामील असलेल्या अहमदाबादमध्ये गेल्या ५ दिवसांत दर २४ मिनिटाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आता तर गुजरात देशातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. येथे गुरुवारी १६३ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने गुरुवारचे जे आकडे पाठवले आहेत, त्यानुसार कोरोना रुग्णांची संख्या आता ९२९ वर पोहोचली आहे. एवढेच नाही, तर एकट्या अहमदाबादमध्ये ९५ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतांना गुजरात देशातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.