चाळीसगाव प्रतिनिधी । घरासमोर लावण्यात आलेल्या दुचाकीला बाजूला लावण्यास सांगितल्यावरून एकास जबर मारहाण झाल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली होती. दरम्यान फिर्यादीवर रूग्णालयात औषधोपचार सुरू असल्याने आज शहर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली.
सविस्तर वृत्त असे की, किसन दौलत जाधव (वय-४२ रा. ओझर) ता. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. घरासमोर मोटारसायकल उभी असल्याने किसन जाधव यांनी मोटारसायकल बाजूला लावण्यास सांगितले असता यावरून वाद विकोपाला पोहोचला व गौतम बाबुलाल बोराळे यांनी किसन जाधव या फिर्यादीच्या डोक्यावर व तोंडावर लाकडी पाटने मारहाण केल्याची घटना दि.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. त्यात त्यांच्या वरच्या जबड्याचा दात तुटून जबर दुखापत झाली. फिर्यादीचे पुतणे व शेजार्यांनी भांडण सोडायला गेले असता त्यांनाही जयेश उर्फ सोनु गौतम बोराळे व संजय चंद्रभान मोरे यांच्याकडून मारहाण झाली. त्यामुळे फिर्यादीने गौतम बाबुलाल बोराळे, जयेश उर्फ सोनु गौतम बोराळे, चंद्रभान मोरे (पूर्ण नाव माहीत नाही), दिपक चंद्रभान मोरे, विनोद चंद्रभान मोरे व व संजय चंद्रभान मोरे रा. ओझर आदींविरूध्द शहर पोलिस ठाण्यात आज फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे करीत आहेत.