चाळीसगाव बायपासहून मालवाहतूक ट्रक लंपास

चाळीसगाव, प्रतिनिधी । कांदा वाहतूकीसाठी बारा चाकी ट्रक चांदवड या ठिकाणी जात असताना चाळीसगाव बायपासला अचानक ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने उभी करण्यात आलेली १० लाख किंमतीची ट्रक अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूशरणसिंग बलदेवसिंग पल्ला (वय-४० रा. खडका रोड, गडकरी नगर, ता. भुसावळ) हे वरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. बुधवार,२ जून रोजी सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास संतोष ट्रान्सपोर्ट मालेगाव यांच्या मार्फत चांदवड जि. नाशिक येथून कांदा वाहतूकीसाठी ट्रकची मागणी करण्यात आली. त्यावर गुरूशरणसिंग पल्ला हे बारा चाकाची ट्रक (क्र. एम.एच. १९- झेड- ४७५९) भुसावळ येथून सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास पाचोरा-चाळीसगाव मार्गे जाण्यासाठी निघाले. दरम्यान चाळीसगाव बायपास जवळ ट्रकचा डायफ्राम लिक होऊन ब्रेकमध्ये अचानक बिघाड झाल्याने दुपारी १:३० वाजता ट्रक त्याच ठिकाणी उभी करून चालक पल्ला हे कारागिर पाहण्यासाठी चाळीसगाव शहरात गेला. परंतु, सर्व दुकाने बंद असल्याने कारागिर न मिळाल्याने तो ट्रक लावलेल्या मुळ जागी परताला. परंतु ट्रक हे मुळ जागी दिसून आली नाही. त्यावर चालक पल्ला याने मालेगाव रोड, धुळे रोड, औरंगाबाद रोड, नांदगाव रोड आदी ठिकाणी शोधाशोध केली असता मिळून आले नाही. १० लाख किंमतीची सफेद व लाल रंगाची बारा चाकी ट्रक अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट होताच. गुरूशरणसिंग पल्ला यांनी शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.

Protected Content