चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरात बस आगारातील एका वाहकाने संपाच्या ठिकाणी उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव बस आगारातील वाहक समाधान मोरसिंग राठोड (वय-४७) यांनी संपाच्या पाठीमागे उभी केलेली दुचाकी (एम.एच.१९ बीडी ९४५४) अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना १४ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. त्यावर समाधान मोरसिंग राठोड यांनी परिसरात शोधाशोध केली असता २५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी मिळून आली नाही. दरम्यान मित्र विजय मानसिंग वंजारी रा. उपखेड ता. चाळीसगाव यांच्या नावावर असलेली व फिर्यादी वापरत असलेली दुचाकी अज्ञात इसमाने लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यावर समाधान मोरसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.