चाळीसगाव, प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण हे रद्दबातल करण्यात आल्याने सदर आरक्षण हे पुन्हा मिळवून देण्यासाठी चाळीसगावात भाजपातर्फे बोंबाबोंब आंदोलन करून तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (राजकीय) आरक्षण हे रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या हक्काच आरक्षण तातडीने मिळावे यासाठी भारतीय जनता पक्षांकडून तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देऊन ओबीसी समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील निकम यांनी दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारने केलेल्या पुनर्विचार याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून १२ डिसेंबर, २०१९ रोजी राज्य सरकाला ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’ समिती गठीत करून राज्यातील ओबीसी समाजाचा इंम्पेरीकल डाटा जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा असे आदेश दिलेले होते. परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची समिती गठीत करण्यात आलेली नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर साधी प्रतिक्रिया ही दिलेली नाही. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या पंधरा महिन्यांपासून पत्राद्वारे गंभीर बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र पत्रांवर कुठल्याही प्रकारची उत्तरे न मिळाल्याने भारतीय जनता पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटवली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर हि मागणी पूर्ण करावी अन्यथा शेकडो ओबीसी समाज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी भारतीय जनता पक्षांकडून देण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सरचिटणीस अमोल नानकर, कैलास पाटील, सतिष पाटे, योगेश खेडेलवाल, संभाजी फूले, किशोर रणधीर, शाम पाटील व भास्कर पाटील आदी उपस्थित होते.